५२.गुरुचरित्राचे पारायण कर.
श्रीगुरुचरित्राचे श्रवण करताना नामधारकाचे मन ब्रह्मानंदात लीन झाले. सिद्धमुनींना संतोष वाटला. अरे, भानावर ये, तुला प्राप्त झालेले ज्ञान तुझ्या मनातच ठेवू नकोस. बाकीचे लोक तरायला पाहिजेत ना. शिष्याच्या विनंतीवरून श्रीगुरुचरित्राचे सारच हाती आले. मन पवित्र असताना सर्व काळ श्रीगुरुचरित्र वाचावे, ऐकावे, गावे देखिल .
ऐसे भक्ता संबोखोनि । उठले श्रीगुरु तेथुनि ।
पुष्पासनी बैसोनि । निरोप देती भक्तांसी ।।३४।।
इतुकिया अवसरीं । प्रसादपुष्पे आला चारी ।
मुख्य शिष्य प्रीतिकरीं। काढोनी घेती अवधारी ।।५९।। अध्याय ५२
नामधारका ऐकलीस तू, भावभरे गुरुचरितकथा,
प्रेमाश्रूच्या झरती धारा, हरल्या चिंता, तशा व्यथा ।।१।।
भानावर ये, तू तरलासी, तारायाचे भक्तजनां,
जे जे ठावे ते शिकवावे, चंदनगंधित करी मना ।।२।।
गुरुचरिताचे पारायण कर, धीर द्यायचा भीतांना,
सदैव सद्गुरु पाठ राखती, सत्यासाठी लढताना ।।३।।
हीन अमंगल ते ते जाळ, औचित्याचा विवेक पाळ,
दुष्टांचा हो कर्दनकाळ, रुद्राक्षांची माळा घाल ।।४।।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
त्वरा करा त्वरा करा, भवसागर हा पार करा ।।५।।
संचारी मी, मीच भाषणी, विचारात मी वर्तनात मी,
गायनात मी, वादनात मी, घे अनुभूती आत्मा मी ।।६।।
दत्तासम देऊन टाकणे, काणाचे ना उसने घेणे,
वाढत जाते ज्ञान दिल्याने, उजळ कुडीला नाम जपाने ।।७।।
No comments:
Post a Comment