Friday, March 5, 2010

३९. सुफल लाभले सेवेला.

३९. सुफल लाभले सेवेला.

साठ वर्षांच्‍या गंगा या स्‍त्रीला मूलबाळ होत नव्‍हते. सोमनाथ या पतीबरोबर ती गुरुसेवेस येई. तू निरांजन आणतेस, पूजेला ओवाळतेस. काय हवे तुला? नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद देतील. संभाषणाच्‍या ओघात श्रीगुरु म्‍हणाले, अश्वत्‍थसेवा कर. पिंपळाच्‍या झाडाला नकोस दोष देऊ। गुरुवाक्‍य म्‍हणजे कामधेनु समजून आराधना घडली. ती प्रसूत होऊन कन्‍यारत्‍न झाले आणि गुरुकृपाप्रसादे पुत्रही झाला.

बाळक आणेनि भक्तींसी । ठेविलें श्रीगुरुचरणांशी।
नमन करीत साष्‍टांगेसी एक भावे करुनिया ।।४८।। अध्‍याय ३९ ।।
अपार महिमा ज्‍याचा तुझिया कानी नच आला
उताविळपणे नकोस निंदू पिंपळ वृक्षाला।।ध्रु.।।
चूक आपली असून माणूस बोल लावते नशिबाला
देहदु:ख वा मनोभंग हा योग्‍यच फळ ते कर्माला
श्रीगुरु भेटत, ना विश्वासत - अंत न तर प्रारब्‍धाला ।।१ ।।
संगमावरी तीरावरती पिंपळ मोठा असे पहा
सर्व देव त्‍या ठायी वसती, तिथे चाललो नीट पहा
त्‍याची सेवा तनुमनुजीवे तूच करावी वदत तुला।।२।।
गाणगापुरला श्रीगुरु असती, सात प्र‍दक्षिणा त्‍यांना घाल
भक्तिभावना धरून अंतरी लोटांगण त्‍यांना घाल
दोन फळे कर मोदे सेवन शपथ शपथ होशी अमला।।3।।
गुरुप्रसादे प्रौढ असूनही गर्भधारणा तिज झाली
निपजे कन्‍या उदरी तिचिया त्‍यांच्‍या चरणी ती घाली
पुत्र नसे तरी सरस्‍वती घरी आली ना बोलवे तिला।।४।।
अभागिनी जी वृद्धा समजे पुढे तिला मुलगा झाला
वेदशास्‍त्र संपादन केले मोजमाप ना कीर्तीला
हरिरुपे अश्वत्‍थच असतो श्रद्धाभाव हवा जपला।।५।।
वनवैभव हे जतन करावे खचित संपते प्रदूषण
यत्‍नाला ना कधी चुकावे टाळण्‍यास अपुले मरण
अस्तित्त्‍वाचा अनुभव ऐसा सुफल लाभले सेवेला।।६।।

गुरुनिष्ठा उपयोगी आली.

३८. गुरुनिष्ठा उपयोगी आली

भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्रीगुरूंचा भक्त होता. मनात संकल्प होता, आपण श्रीगुरुंना भिक्षा घालावी. जवळ तिघांना पुरेल इतकीच शिधासामग्री होती. इतर शिष्यांनी भास्कराचा उपहास केला. श्रीगुरुंनी त्याला त्यादिवशी स्वयंपाक करून भिक्षा घालायला सांगितले. ब्राह्मणाने केलेला स्वयंपाक श्रीगुरुंनी कितीतरी ब्राह्मणांना पुरेल असा करवला. श्रीगुरुंनी त्याला आशीर्वाद दिला. तुझे दारिद्र्य दूर होईल. तुला पुत्र पौत्र होतील.

झाकिले वस्त्र अन्नावरी। कमंडलु उदक घेऊनि करी । 
श्रीगुरु प्रोक्षिती अन्नावरी । अभिमंत्रोनि तये वेळी । । ५० । । अध्याय ३८ ।।

भिक्षा घाल श्रीगुरु वदले, मन मोहरले । मन गहिवरले!ध्रु.

तुटपुंजे साहित्यच जवळी, काळजी न परि मना वाटली
स्वयंपाक सत्वर ही झाला, परब्रह्म जणु मला पावले!१

आरंभी उपहास साहिला, चला विप्रवर जेवायाला
आपणासवे श्रीगुरु जेवत, असे सांगता सगळे जमले!२

अन्न गुरुंच्या जवळ ठेवले, वस्त्राने होतेच झाकले
भरा भरा परि अन्न वाढले, पुरुन उरले । पुरुन उरले!३

तुझी गरीबी दूर जाहली, संतानाची चिंता सरली
औदार्या त्या नव्हती सीमा, धन्य धन्य सद्गुरु माऊली!४

कोमल भक्तिभाव जपावा, संशयास तिळ वाव न द्यावा
गुरुनिष्ठा उपयोगा आली, कृपा आगळी । कृपा जाणली!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Wednesday, March 3, 2010

महिमा शुद्धाचरणाचा.

३७. महिमा शुद्धाचरणाचा

या अध्यायात श्रीगुरुंनी पराशर ऋषींच्या उपदेशाच्या आधारे ब्राह्मणाला आचारधर्म सांगितला. पूजाविधी सांगितला. पाषाणाची मूर्ती पूजिली तरी देव प्रसन्न होतो हे सांगितले. ब्राह्मणाच्या आचारधर्माचे पालन करणारा देवांनाही वंद्य होईल. त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल. भोजन नुसते केले तर उदरभरण होईल पण शास्त्रोक्त विधीने केले तर यज्ञकर्म ठरते.

ऐसा ब्राह्मणाचा आचार| सांगता झाला पराशर।
ऐकोनि समस्त ऋषीश्वर । तेणेंपरी आचरती ।।२७८।। अध्याय ३७

श्रीगुरु येथे सांगत महिमा शुद्धाचरणाचा
राम कृष्ण हरि, विठ्ठल दत्त उच्चारो वाचा! ध्रु.

संध्यावंदन, प्रतिमापूजन आवश्यक असते
ध्‍यान तसे मन लावुन भोजन अंगी लागते
मी कर्ता ना भोक्ता जाणे तो नर भाग्याचा!१

आहारावर असे नियंत्रण शाकाहार बरा
सात्विकतेला पोषक ऐसा दुग्धाहार बरा
पोषणातही परिसर घेतो वाटा मोलाचा!२

लाच न घ्यावी, पोटासाठी विकू नये विद्या
स्वाध्‍यायाने स्वावलंबने वेदांची विद्या
उच्चाराची शुद्धि जपत तो विषय कौतुकाचा!३

वंदनभक्ती मने जिंकण्या उपकारक ठरते
जे ठावे ते जनां शिकवता समाधान मिळते
अपुल्या गरजा कमी कराव्या सांगावा गुरुचा!४

द्वेषाने धगधगती ज्वाळा दाहकता जाचे
मत्सर करता चडफडाट हो पोटदुखी जाचे
झाडा द्यावा लागे अंती सगळ्या पापांचा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

३६. कुलस्त्रीचे अंतःकरण दूषित असू नये.