५१. गाणगापुरात आहे.
आता गाणगापुरात आपण गुप्त रहावे व लोकांना मात्र देहाने श्रीशैलयात्रेला जातो हे सांगावे. अमरजा संगमात नित्य स्नान करू, प्रेमाने गुप्तपणे मठातच राहु असे ते म्हणाले. आम्ही निजस्थानाला जातो, तेथे पोचल्यावर खुणा म्हणून फुले पाठवू असे ते म्हणाले. गायनात माझे स्मरण करा असे आवर्जून सांगितले. श्रीगुरुंचा महिमा व श्रीगुरुचरित्र म्हणजे जणू कामधेनुच आहे.
ऐसे सांगोनि तयासी। निघाले स्वामी श्रीपर्वतासी।
भक्त परतानि मठासी। आले चिंतीत मनात ।।२५।।
चिंतती रिघती मठात, तेथे दिसती श्रीगुरुनाथ,
लोक झाले विस्मित । म्हणती वस्तू त्रिमूर्ति ।।२६।। अध्याय ५१
चिंता नका करु बाळांनो,
गाणगापुरात आहे,
जरी न दिसलो मठात येथे,
गुप्तपणाने राहे ।।ध्रु।।
दृश्याला भुलतो अज्ञानी,
आत्मतत्व ओळखती ज्ञानी,
वियोग हासत साहे ।।१। ।
प्रसाद शेवंतीची सुमने,
घेऊन अपुल्या गावी जाणे,
स्मरता भेटत राहे ।।२।।
वेष जरी हा संन्यासाचा,
मी पुरुषांचा तसा स्त्रीयांचा,
शुचित्व बनुनी राहे ।।३।।
रुद्राक्षांची गळ्यात माळा,
तेज चढविते तीच तपाला,
रविप्रभा मी आहे ।।४।।
गुरुचरिताला गीती गाता,
हळवेपण अंतरात भरता,
आईचे मन आहे ।।५।।
शिक्षक माझा वसा चालवी,
गुरुवंदना प्रेमे शिकवी,
विवेक जागविताहे।।६।।
दत्त दत्त नित घोकत जावे,
वाडी औदुंबरहि घडावे,
स्वाभाविकता आहे ।।७।।