Saturday, May 1, 2010

श्रीगुरुचरित्राची आरती

श्रीगुरुचरित्राची आरती

आरती गाऊ श्रीगुरुचरित्रा ।।ध्रु।।

ग्रंथ प्रासादिक लेखन मार्मिक,

मार्गाचा दर्शक भक्ताचा रक्षक,

अनंत अपार ज्ञानाच्‍या सत्रा ।।१।।

बोलका संवाद मना दे आल्‍हाद,

वाणीचा प्रसाद धादांत वेदांत,

गंगेच्‍या जलौघा परमपवित्रा ।।२।।

कथांची गुंफण चित्रांचे दर्शन,

सत्‍याचे मंडन पाखंड खंडन,

प्रत्‍येक अक्षर स्‍फुरवी मंत्रा ।।३।।

गाणगापुरात नरसोबावाडीत,

भिलवडी येथील औदुंबर क्षेत्रात,

निवास आपला अत्रिंच्‍या पुत्रा ।।४।।

शुचिता चिंतनी शुचिता वचनी,

शुचिता वर्तनी शुचिता स्‍पर्शनी,

सखोल चिंतन श्रीरामा अंगारा ।।५।।

५२. गुरुचरित्राचे पारायण कर.

५२.गुरुचरित्राचे पारायण कर.

श्रीगुरुचरित्राचे श्रवण करताना नामधारकाचे मन ब्रह्मानंदात लीन झाले. सिद्धमुनींना संतोष वाटला. अरे, भानावर ये, तुला प्राप्‍त झालेले ज्ञान तुझ्या मनातच ठेवू नकोस. बाकीचे लोक तरायला पाहिजेत ना. शिष्‍याच्‍या विनंतीवरून श्रीगुरुचरित्राचे सारच हाती आले. मन पवित्र असताना सर्व काळ श्रीगुरुचरित्र वाचावे, ऐकावे, गावे देखिल .

ऐसे भक्ता संबोखोनि । उठले श्रीगुरु तेथुनि ।

पुष्‍पासनी बैसोनि । निरोप देती भक्तांसी ।।३४।।

इतुकिया अवसरीं । प्रसादपुष्‍पे आला चारी ।

मुख्‍य शिष्‍य प्रीतिकरीं। काढोनी घेती अवधारी ।।५९।। अध्‍याय ५२

नामधारका ऐकलीस तू, भावभरे गुरुचरितकथा,

प्रेमाश्रूच्‍या झरती धारा, हरल्‍या चिंता, तशा व्‍यथा ।।१।।

भानावर ये, तू तरलासी, तारायाचे भक्तजनां,

जे जे ठावे ते शिकवावे, चंदनगंधित करी मना ।।२।।

गुरुचरिताचे पारायण कर, धीर द्यायचा भीतांना,

सदैव सद्गुरु पाठ राखती, सत्‍यासाठी लढताना ।।३।।

हीन अमंगल ते ते जाळ, औचित्‍याचा विवेक पाळ,

दुष्‍टांचा हो कर्दनकाळ, रुद्राक्षांची माळा घाल ।।४।।

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्‍लभ दिगंबरा,

त्‍वरा करा त्‍वरा करा, भवसागर हा पार करा ।।५।।

संचारी मी, मीच भाषणी, विचारात मी वर्तनात मी,

गायनात मी, वादनात मी, घे अनुभूती आत्‍मा मी ।।६।।

दत्तासम देऊन टाकणे, काणाचे ना उसने घेणे,

वाढत जाते ज्ञान दिल्‍याने, उजळ कुडीला नाम जपाने ।।७।।

Friday, April 30, 2010

५१. गाणगापुरात आहे.

५१. गाणगापुरात आहे.

आता गाणगापुरात आपण गुप्‍त रहावे व लोकांना मात्र देहाने श्रीशैलयात्रेला जातो हे सांगावे. अमरजा संगमात नित्‍य स्‍नान करू, प्रेमाने गुप्‍तपणे मठातच राहु असे ते म्‍हणाले. आम्‍ही निजस्‍थानाला जातो, तेथे पोचल्‍यावर खुणा म्‍हणून फुले पाठवू असे ते म्‍हणाले. गायनात माझे स्‍मरण करा असे आवर्जून सांगितले. श्रीगुरुंचा महिमा व श्रीगुरुचरित्र म्‍हणजे जणू कामधेनुच आहे.

ऐसे सांगोनि तयासी। निघाले स्‍वामी श्रीपर्वतासी।

भक्त परतानि मठासी। आले चिंतीत मनात ।।२५।।

चिंतती रिघती मठात, तेथे दिसती श्रीगुरुनाथ,

लोक झाले विस्मित । म्‍हणती वस्‍तू त्रिमूर्ति ।।२६।। अध्‍याय ५१

चिंता नका करु बाळांनो,

गाणगापुरात आहे,

जरी न दिसलो मठात येथे,

गुप्‍तपणाने राहे ।।ध्रु।।

दृश्‍याला भुलतो अज्ञानी,

आत्‍मतत्‍व ओळखती ज्ञानी,

वियोग हासत साहे ।।१। ।

प्रसाद शेवंतीची सुमने,

घेऊन अपुल्‍या गावी जाणे,

स्‍मरता भेटत राहे ।।२।।

वेष जरी हा संन्‍यासाचा,

मी पुरुषांचा तसा स्‍त्रीयांचा,

शुचित्‍व बनुनी राहे ।।३।।

रुद्राक्षांची गळ्यात माळा,

तेज चढविते तीच तपाला,

रविप्रभा मी आहे ।।४।।

गुरुचरिताला गीती गाता,

हळवेपण अंतरात भरता,

आईचे मन आहे ।।५।।

शिक्षक माझा वसा चालवी,

गुरुवंदना प्रेमे शिकवी,

विवेक जागविताहे।।६।।

दत्त दत्त नित घोकत जावे,

वाडी औदुंबरहि घडावे,

स्‍वाभाविकता आहे ।।७।।

५०. व्‍याधी बरी करावी स्‍वामी.

५०. व्‍याधी बरी करावी स्‍वामी.

तो धोबी पुन्‍हा जन्‍मला आणि बिदरचा बादशाह झाला. पण रजकाच्‍या जन्‍माच्‍या आधीचे भोग भोगायचे राहून गेले होते. बादशहाच्‍या मांडीवर फोड आला. ते दुखणे बरे होईना. या जन्‍मी नदीतीरीच स्‍वामी भेटले। यवन बादश्‍ाहा कळवळून म्‍हणाला

चतुश्चत्‍वारिशतं कोश देखा। राजा पातला दिवसें एका ।

पापविनाशी तीर्थी निका । अवलोकीतसे श्रीगुरुसी ।।२२७।। अध्‍याय ५०

व्‍याधी बरी करावी स्‍वामी, व्‍याधी बरी करावी ।।ध्रु।।।

गतजन्‍मीचा धोबी होतो,

या जन्‍मीचा राजा होतो,

माया नरा वाचवी ।।१।।

मांडीवर परि फोडच आला,

दु:ख असे कुणी टोचत भाला,

युक्ती काय करावी ? ।।२।।

म्‍लेंच्‍छ मी परि द्वेष न ठावा,

खुदा मला सर्वत्र दिसावा,

वाट दाखवा बरवी ।।३।।

संगमावरी भेट जाहली,

आस दुजी ना कसली उरली,

कुडी कृपांकित व्‍हावी ।।४।।

लागे हुरहुर सुखही वाटे,

फुले जाहली पथि जे काटे,

किमया कशी कळावी ? ।।५।।

Thursday, April 29, 2010

४९. गुरुगीता

४९. गुरुगीता

सिद्धांनी गुरुगीता शंभुमुखातून जशी आली तशी नामधारकास सांगितली. सर्व लोकांचा उद्धार व्‍हावा यासाठी हिमालयाची कन्‍या पार्वती हिने शंकरांना प्रश्न विचारला त्‍याचे उत्तर म्‍हणजे गुरुगीता. देहधारी जीव कोणत्‍या मार्गाने ब्रह्मरुप होईल ? शंकर म्‍हणाले - गुरुशिवाय अन्‍य परब्रह्म नाही. हा गुरुच्‍या महतीचा अध्‍याय आहे. गु हा वर्ण गुणातीत अवस्‍था दर्शवितो. तर रु हां वर्ण रुपापलीकडची अवस्‍था सुचवितो.

पार्वती पुशिलें ईश्वराप्रती। ईश्वरे सांगितले कवणे रीती।
जेणे लोक उद्धरती। ते निरोपावें दातारा ।।९।।
पूर्वी कैलासशिखरी । बैसला होता त्रिपुरारि।
प्रश्न करी शैल्‍यकुमरी। समस्‍त लोक उद्धरावया ।।१३।। अध्‍याय ४९।।

श्रीगुरुगीता ऐकावी। श्रीगुरुगीता उमजावी ।।ध्रु।।।
शिव जे कथिती उमा ऐकते,
श्रवणाने ती समरस होते,
शंका समूळ निरसावी।।१।।
मंत्ररुप झाली गुरुगीता,
आश्वासन ती देते पतिता,
वाट भक्तीची चालावी ।।२।।
अनुग्रहाने, अभ्‍यासाने,
जिज्ञासेने समर्पणाने,
गुरु ही पदवी लाभावी ।।३।।
शिल्‍पकार गुरु अनुपम ऐसा,
चेला घडवी आपण जैसा,
परिसा ती सर ना यावी ।।४।।
गुरुगौरव गानात रमावे,
गुरुगौरवगानात विरावे,
दुधात साखर मिसळावी ।।५।।

४८. स्‍वामी तुमचे वाक्‍य मला प्रमाण

४८. स्‍वामी तुमचे वाक्‍य मला प्रमाण

पर्वतेश्वर नावाच भक्त शूद्र होता. त्‍याने कायावाचामने गुरुभक्ती केली. त्‍याच्‍या शेतावरून जेव्‍हा जेव्‍हा श्रीगुरु जात तेव्‍हा तेव्‍हा साष्‍टांग नमस्‍कार घालत असे. श्रीगुरु शेताजवळ आले, म्‍हणाले ऐकणार असलास तर सांगतो, मी परत येईपर्यंत पीक कापून टाक. गुरुवचन आपल्‍याला प्रमाण म्‍हणून त्‍याने सर्व पीक कापून टाकले. त्‍याची गुरुनिष्‍ठा पाहून गुरु संतोषले. गाव नापीक ठरला पण शेतकर्‍याला पीक दसपट लाभले.

विनोदे तुज सांगितले। तुवा निधरि कापिलें।

म्‍हणे तुमचे वाक्‍य भलें। तेचि कामधेनु मज ।।३३।।

ऐसे ऐकोनि श्रीगुरु म्‍हणती। निर्धार असेल तुझे चित्ती ।

होईल अत्‍यंत फळश्रुती। चिंता न करी म्‍हणोनियां ।।३४।। अध्‍याय ४८।।

वाहत मी हीच आण, श्रीगुरुवचन मज प्रमाण ।।ध्रु।।।

वर्ण शूद्र, शेत कसत, श्रीगुरु जधि येत जात,

भावभरे त्‍यांस नमित, करित सदा नामगान ।।१।।

शेत चांगले पिकु दे, भक्त एवढेच वदे,

गुरुदेवा तुज वंदे, आज्ञांकित मी अजाण ।।२।।

आज्ञा जर पीक काप, भंग तिचा घोर पाप,

मम मनास नाही ताप, सुस्‍वर मी गात गान ।।३।।

कामधेनु आज्ञा ही, ना ममता या देही,

सदय मला करि विदेही, भक्तीतुन निघत ज्ञान ।।४ ।।

दृढभक्ती दैन्‍य कुठे ? लाभ जिथे हानि कुठे,

सत्‍य जिथे, विजय तिथे, देवविले विपुल दान ।।५।।

Wednesday, April 28, 2010

४७. श्रीगुरु सात ठायी गेले

४७ . श्रीगुरु सात ठायी गेले

गाणगापुरात असताना दिवाळीचा सण आला। वेगवेगळ्या गावात राहणार्‍या सात शिष्‍यांनी आपल्‍याच घरी भिक्षेला येण्‍याचा आग्रह धरला. स्‍वामी तुम्‍ही कुणालाही निराश करू नये जे सांगाल ते आम्‍ही करू. साती जणांची मी तुझ्याच घरी येतो अशी समजूत घालून त्‍यांना आपापल्‍या घरी पाठविले. आम्‍ही इथेच राहणार आहो असे गाणगापुरात म्‍हटले. श्रीगुरुंनी आठ रुपे घेतली व साती शिष्‍यांकडे पूजेला गेले. तरी पण वाडीत ते होतेच.

आठ रुपे झाले आपण । अपार महिमा नारायण ।
सात ठायीही गेले आपण। गाणगापुरी होतेची ।।२६।। अध्‍याय ४७।।

गाणगापुरी असुनि आपण आठरुप जाहले,
श्रीगुरु सात ठायी गेले ।।ध्रु।।।
प्रत्‍येकाचा गाव वेगळा,
प्रत्‍येकाचा हट्ट आगळा,
सर्वांच्‍या घरी कैसे येणे?
कुणी न हे जाणले ।।१।।
उच्‍च नीच ना भेद पाहिला,
जवळ दूरचा भेद न केला,
मायमाउली सगळ्यांचे गुरु,
प्रतिघरी ते जेवले ।।२।।
गाणगापुरा नाही त्‍यजिले,
आनंदरुपे भरले उरले,
मायेला सीमा न आईच्‍या,
सजल जलद वर्षले ।।३।।
गावोगावी अशी दिवाळी,
गाणगापुरी तरी दिवाळी,
आलो होतो प्रतिसदनी मी
ध्‍यानी आणुन दिले ।।४।।
सिद्धेशाला वश सिद्धी ही
ॐ गुरु ऐसी साक्ष प्रत्‍यही,
नवलाईची नवलकथाही,
स्‍मरता मन हलले ।।५।।

Tuesday, April 27, 2010

४६. तुम्‍हीच माझे कल्‍लेश्वर

४६ . तुम्‍हीच माझे कल्‍लेश्वर

हिप्‍परगी गावात कल्‍लेश्वर नावाचे शिवलिंग होते. नरहरि नावाचा ब्राह्मण पुजारी कवी होता. त्‍याला कोणी श्रीगुरुंवर कवित्‍व करण्‍यास सांगितले. नकार देऊन तो शिवपूजेला गेला. पण देवळातच त्‍याला स्‍वप्‍न पडले. शिवलिंगावर श्रीगुरु बसलेले दिसले. श्रीगुरु हेच शिव हे त्‍याला पटले. त्‍याचे अंत:करण स्थिर झाले. तोही शिष्‍य झाला.

निद्रा केली देवळात। देखता झाला स्‍वप्‍नात ।
लिंगावरी श्रीगुरु बैसत । आपण पूजा करितसे ।
लिंग न दिसे श्रीगुरु असे । आपणासी पुसती हर्षे।
नरावरी तुझी भक्ती नसे । कां गा आमुतें पूजितोसी।।१५ -१६ ।। अध्‍याय ४६ ।।

श्री कल्‍लेश्चर प्रसन्‍न झाला।
श्रीगुरु शंकर पटे मनाला ।।ध्रु।।।
नित्‍य पाच कवने घडली,
अति दूरवर कीर्ति पसरली,
परि मी होतो झपाटलेला ।।१।।
नर हर आहे नर हरि आहे,
कळून सारे चुकले आहे,
पाश अहंचा क्षणात तुटला ।।२।।
क्षमा करावी अज्ञानाची,
अविचाराने निंदायाची,
शिव परमार्थी यात्री चालला ।।३।।
सर्वव्‍यापी श्रीशिव असता,
एकदेशी श्रीशिव मानता,
शिवगुरु एकच अनुभव आला।।४।।
शिवभक्तीच्‍या पुण्‍याईने,
श्रीगुरुरुपी सुवर्णनाणे,
परमलाभ हा खरेच झाला।।५।।

४५. श्रद्धा कशी पक्‍क्‍ी हवी

४५. श्रद्धा कशी पक्‍क्‍ी हवी

नंदी नावाचा कोड उठलेला ब्राह्मण्‍ा श्रीगुरुंच्‍या दर्शनासाठी आला. आधी देवीमातेची आराधना केली होती. धरणे धरून बसल्‍यावर त्‍याला गाणगापुराला जाण्‍याचा दृष्‍टांत झाला. श्रीगुरुंनी विचारलेच - मनात संशय धरून का आलास? त्‍याने अज्ञानाची कबुली दिली. संगमावर स्‍नान करून आला. अश्वत्‍थाला प्रदक्षिणा घातल्‍या. पोटरीवरचे कोडही गुरुंच्‍या स्‍तुतीपर कवितेमुळे नाहीसे झाले. अज्ञानी नंदीच्‍या जिभेवर भस्‍माची चिमूट ठेवून त्‍याला ज्ञान व काव्‍यशक्ती दिली.

श्रीगुरु म्‍हणती द्विजासी। मुख उघडी काढी जिव्‍हेसी।
विभूती शिंपिती तयासी । ज्ञान उपजले ब्राह्मणा।।६५ ।।अध्‍याय ४५ ।।

मी अज्ञानी, नामे नंदी, श्रीगुरुंनी केले आनंदी।।ध्रु।।।
सर्वांगावर कोड उमटले, आप्‍तांनी मज दूर लोटले,
चामडीच का, हे जग बघते, घरीच झालो बंदी ।।१।।
उपासना केली देवीची, परि नच करुणा आली माझी,
अंतरिची आर्तता वाढली, आवेगे आक्रंदी।।२।।
हवीच श्रद्धा अगदी पक्‍की, दिसे प्रयत्‍ने प्रगती नक्‍की,
धीराने सोसावे लागे, सुयश लाभते अंती ।।३।।
संगमात आचरिले स्‍नाना, गुरुस्‍तुतीपर केली रचना,
उरले सुरले कोड मावळे, आदरपूर्वक वंदी।।४।।
ज्ञान आपली चूक शोधते, सुधारले जग पुढती जाते,
अनुसंधाना राखायाचे, तरीच लाभे सिद्धी ।।५।।

Sunday, April 25, 2010

४४. श्री शैलपर्वती नेले

४४. श्री शैलपर्वती नेले

श्रीगुरुंच्‍या अनेक भक्तांत एक विणकरही होता। तो तिसर्‍या प्रहरी मठाचे आंगण झाडत असे। दुरून नमस्‍कार करीत असे. शिवरात्रीला त्‍याचे मातापिता यात्रेला निघाले. तेव्‍हा त्‍यांच्‍याबरोबर तो गेला नाही. श्रीशैल पर्वताचे दर्शन घडविण्‍याचा चमत्‍कार श्रीगुरुंनी घडविला. मनोवेग उपयोगी पडला. पण गुरुंनी त्‍याला सांगितले सर्व चराचर जरी इश्वरानेच व्‍यापलेले असले तरी विशिष्‍ट स्‍थानाचे महात्‍म्‍य हे असतेच।

क्षणैक मात्र निद्रावस्‍था । म्‍हणता झाला जागृत ।

अवलोकिता पर्वत दिसत । म्‍हणे स्‍वप्‍न किंवा सत्‍य ।।१९।। अध्‍याय ४४ ।।

मी साधा विणकर भक्त, श्रीगुरुचरणी आसक्त,

ना दुसरे काही रुचत, गुरुदेवा घ्‍यावी सेवा ।।१।।

तुम्‍ही श्रीशिवशंकर माझे, अंतरात मूर्ति विराजे,

पदविरह न मज सहवत, मन सुमन करा ते साजे ।।२।।

गुरुचरणी सगळ्या यात्रा, दृढभाव प्रभावी मात्रा,

उतराया कठिण कसोटी, पुरवा बळ चित्ता गात्रा ।।३।।

मग अघटित काही घडले, श्रीशैलपर्वती नेले,

शिवरुप सद्गुरु बघता, ज्ञानाचे नयन उघडले ।।४।।

तुज बाळा सांगत आहे, स्‍थानाचा महिमा पाहे,

अज्ञान असे तव गेले, गुरुकृपेस सीमा नोहे, शिवकृपेस अंतच नोहे ।।५।।

43. व्रत जे घ्‍यावे, पाळावे ते.

४३. व्रत जे घ्‍यावे, पाळावे ते.

या अध्‍यायात सायंदेवाला श्रीगुरुंनी अनंत व्रताचे महात्‍म्‍य सांगितले. श्रीकृष्‍णाने वनवासात युधिष्ठिराला हेच व्रत सांगितले. कौंडिण्‍य ऋषींची पत्‍नी सुशीला हिला या व्रताची महती कळली. पण तिने हातात बांधलेला अनंत (हा धागा) कौंडिण्‍याने आगीत टाकला. पण त्‍याला दारिद्र्य आले. अनंताचे दर्शन घेतल्‍याविन अन्न घेणार नाही म्‍हणत अरण्‍यात भटकला असता त्‍याला अनंताने दर्शन दिले. पश्‍चात्तापाने कौंडिण्‍याची चित्तशुद्धी झाली. देवाची कृपा झाली.

इतुकिया अवसरी । वृद्ध ब्राह्मण वेषधारी।
जवळी झाला परिकरी । उठी उठी म्‍हणसे ।।१२८।। अध्‍याय ४३

युधिष्ठिरा व्रत वनवासी कथितो,
अनंत त्याचे नाव ।।ध्रु।।।
गेले वैभव पुन्‍हा लाभते,
स्‍वार्थ जिंकला जणु परमार्थे,
अनंत माझे नाव ।।१।।
भा्द्रपदाची शुक्‍ल चतुर्दशी,
पाळावे व्रत त्‍या शुभदिवशी,
पैल लागते नाव ।।२।।
सुमंत पत्‍नी दीक्षा गेली,
सुता सुशीला मात्र राहिली,
उत्‍कट ठरला भाव ।।३।।
कौंडिण्‍याची झाली पत्‍नी,
तीही गेली पतीमागुनी,
श्रीहरि घेई धाव ।।४।।
अनुतापे कोंडिण्‍य पोळला,
अनंत शोधा वनी भटकला,
स्‍वस्‍वरुपी घे ठाव ।।५।।
व्रत जे घ्‍यावे पाळावे ते,
कडवेपण मग तनिमनि येते,
उजळतसे तर नाव ।।६।।

४२. सोपव सारे सद्गुरुवरती

४२. सोपव सारे सद्गुरुवरती

श्रीगुरुन्नी सायंदेवाला कथा सांगितली. ब्रह्मदेवाचा अवतार त्‍वष्‍टा. योग्‍यवेळी मुंज झाली. विद्याभ्‍यासाला गुरुगृही गेला. गुरुंसाठी पक्‍के घर बांधणे, गुरुपत्‍नीसाठी विणकाम नसलेली काचोळी वगैरे इच्‍छा कशा पूर्ण करायच्‍या? एका यतीने त्‍याला काशीयात्रेचा उपाय सांगितला. शंकर प्रसन्‍न झाले. सृष्‍टीतील सर्व वस्‍तू निर्माण करण्‍याची शक्ती लाभली. त्‍याने शिवलिंग स्‍थापले तोच विश्वेश्वर. कथा ऐकताना सायंदेवालाही काशीयात्रा घडली.

पुत्र कलत्रेसहित नमोन । सांगे क्षेम समाधान।
होते पुत्र दोघेजण । चरणावरी घातले ।।१९१ ।।
ज्‍येष्‍ठसुत रंगनाथ । तयावरी कृपा बहुत ।
कृपानिधी श्रीगुरुनाथ । माथां हात ठेवती।।१९२ ।। अध्‍याय ४२ ।।

मनात येता घडते काशी,
का जीवा तू तळमळशी,
सोपव सारे सद्गुरुवरती
मने पावसी तू काशी ।।१ ।।
शिव शिव म्‍हणता श्रीविश्वेश्वर,
प्रसन्न होती तुझ्यावर,
कुरकुर सगळी सोडून द्यावी
गुर्वाज्ञा घे मनावर ।।२।।
भीतीने भीतीच वाढते,
निष्‍ठा निष्‍ठा वाढवते,
करु गेले की सगळे जमते,
कुरकुर ना करती ज्ञाते ।।३।।
तुझ्या प्रयत्‍ने गुरु तोषतील,
सगळी काशी घडे तुला,
का नसत्‍या वेड्या शंकेने,
प्राण तुझा रे तळमळला ।।४।।
त्‍वष्‍ट्याच्‍या हे प्रियकुमरा रे,
विश्वकर्मा नाम मिळे,
गुरुच्‍या सगळ्या पुरती इच्‍छा,
आनंदाश्रू ओघळले ।।५।।

Wednesday, April 21, 2010

४१. कठिण, कठिण, श्रीगुरुसेवा

४१. कठिण, कठिण, श्रीगुरुसेवा

नामधारक शिष्‍याने सिद्धमुनींना वंदन करून विचारले, स्‍वामी, माझ्या पूर्वजांनी श्रीगुरुंची सेवा कशी केली होती? नामधारकाचे पूर्वज सायंदेव। सायंदेवाची परीक्षा श्रीगुरुंनी पाहिली. तेव्‍हा तर वाटले गुरुसेवा अत्‍यंत कठिण आहे. तात्‍पर्य - गुरुसेवा फार विचार करून स्‍वीकारावी. मृत्‍यूचीही भिती बाळगता कामा नये.

पाच फडेचे दिसती दोनी । सेवेंचि येताति धांवोनि ।
विप्र भ्‍याला आपुले मनीं । धावतसे भिऊनिया ।। ७४ ।। अध्‍याय ४१ ।।

कठिण कठिण श्रीगुरुसेवा,
भयशंका नच मनि ठेवा ।।ध्रु।।।
सोसाट्याचे येवो वादळ,
पाऊस घालो सुखे धुमाकुळ,
तोंड द्यावया धरी हवा।।१।।
श्रीगुरु धैर्यपरिक्षा घेती,
घालवती मृत्‍यूची भीती,
संजीवन लाभते जीवा।।२।।
गुर्वाज्ञेचे पालन करता,
अटी घालती ध्‍यानी घेता,
द्वंद्वाचा लोटतो थवा ।।३।।
सर्पहि रक्षणकर्ते होती,
वाघाचीही कसली भीती,
चेला तर निधडाच हवा ।।४।।
तीर्थांची देहातच वसती,
प्रवासास का जन धडपडती,
विश्वेश्वर चित्तात हवा ।।५।।

Tuesday, April 20, 2010

४०. लाकडाला पालवी फुटली.

४० लाकडाला पालवी फुटली
श्रीगुरु गाणगापुरास असताना नरहरि नावाचा कुष्‍ठरोगी ब्राह्मण्‍ा त्‍यांना शरण आला. श्रीगुरुंनी म्‍हटले, तू गतजन्‍मी फार पाप केलेस म्‍हणून तुझी अशी अवस्‍था झाली. त्‍यांनी उंबराचे एक वाळके लाकूड देऊन त्‍याला संगमावर भीमातीरी रोपून रोज दोन कळशा पाणी घालायला सांगितले. पालवी फुटायला लागली की कोड बरे होऊ लागेल म्‍हणाले. ब्राह्मणाने सात दिवस उपास केले. जसा भाव तशी सिद्धी. सदगुरुंनी कंमंडलूतील पाणी शुष्‍क लाकडावर टाकताच औदुंबर झाला. नरहरीचा देह निरोगी झाला.

होता कमंडलू करकमळीं। भरले सदा गंगाजल।
उचलोनिया करकमळें। घालिती उदक काष्‍ठासी ।।६।। अध्‍याय ४० ।।

सद्गुरु, सद्गुरु, सद्गुरु, सद्गुरु
नसे विसावा रसनेला
संगमावरी लाकुड रोवून
घाली पाणी काष्‍ठाला ।।१।।
कुष्‍ठाने पीडिला नरहरी
दु:ख निवेदी दत्ताला
उपासना जर अविरत घडली
भाग्‍यतरु ये बहराला।।२।।
दोनच कळशा नियमित पाणी
औदुंबर खुलला फुलला
कुचेष्‍टेस ना जुमानले हो
भाव पोचता सिद्धीला।।३।।
कलंक सगळे धुतले जाती
कुमतीची बने सुमती
कुष्‍ठरोग चालला लयाला
सद्भक्ता येते प्रचिती।।४।।
अपुल्‍यापुरते क्षेत्र पहावे
सेवा चालू ठेवावी
दत्तात्रेयांसाठी खुपुनी
कुडी कारणी लावावी।।५।।
गुरुवाक्‍याला प्रमाण माना
संशय ना घेता कसला
नामसागरी जो जो बुडला
खरेच तो तरला तरला।।६।।

Friday, March 5, 2010

३९. सुफल लाभले सेवेला.

३९. सुफल लाभले सेवेला.

साठ वर्षांच्‍या गंगा या स्‍त्रीला मूलबाळ होत नव्‍हते. सोमनाथ या पतीबरोबर ती गुरुसेवेस येई. तू निरांजन आणतेस, पूजेला ओवाळतेस. काय हवे तुला? नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद देतील. संभाषणाच्‍या ओघात श्रीगुरु म्‍हणाले, अश्वत्‍थसेवा कर. पिंपळाच्‍या झाडाला नकोस दोष देऊ। गुरुवाक्‍य म्‍हणजे कामधेनु समजून आराधना घडली. ती प्रसूत होऊन कन्‍यारत्‍न झाले आणि गुरुकृपाप्रसादे पुत्रही झाला.

बाळक आणेनि भक्तींसी । ठेविलें श्रीगुरुचरणांशी।
नमन करीत साष्‍टांगेसी एक भावे करुनिया ।।४८।। अध्‍याय ३९ ।।
अपार महिमा ज्‍याचा तुझिया कानी नच आला
उताविळपणे नकोस निंदू पिंपळ वृक्षाला।।ध्रु.।।
चूक आपली असून माणूस बोल लावते नशिबाला
देहदु:ख वा मनोभंग हा योग्‍यच फळ ते कर्माला
श्रीगुरु भेटत, ना विश्वासत - अंत न तर प्रारब्‍धाला ।।१ ।।
संगमावरी तीरावरती पिंपळ मोठा असे पहा
सर्व देव त्‍या ठायी वसती, तिथे चाललो नीट पहा
त्‍याची सेवा तनुमनुजीवे तूच करावी वदत तुला।।२।।
गाणगापुरला श्रीगुरु असती, सात प्र‍दक्षिणा त्‍यांना घाल
भक्तिभावना धरून अंतरी लोटांगण त्‍यांना घाल
दोन फळे कर मोदे सेवन शपथ शपथ होशी अमला।।3।।
गुरुप्रसादे प्रौढ असूनही गर्भधारणा तिज झाली
निपजे कन्‍या उदरी तिचिया त्‍यांच्‍या चरणी ती घाली
पुत्र नसे तरी सरस्‍वती घरी आली ना बोलवे तिला।।४।।
अभागिनी जी वृद्धा समजे पुढे तिला मुलगा झाला
वेदशास्‍त्र संपादन केले मोजमाप ना कीर्तीला
हरिरुपे अश्वत्‍थच असतो श्रद्धाभाव हवा जपला।।५।।
वनवैभव हे जतन करावे खचित संपते प्रदूषण
यत्‍नाला ना कधी चुकावे टाळण्‍यास अपुले मरण
अस्तित्त्‍वाचा अनुभव ऐसा सुफल लाभले सेवेला।।६।।

गुरुनिष्ठा उपयोगी आली.

३८. गुरुनिष्ठा उपयोगी आली

भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्रीगुरूंचा भक्त होता. मनात संकल्प होता, आपण श्रीगुरुंना भिक्षा घालावी. जवळ तिघांना पुरेल इतकीच शिधासामग्री होती. इतर शिष्यांनी भास्कराचा उपहास केला. श्रीगुरुंनी त्याला त्यादिवशी स्वयंपाक करून भिक्षा घालायला सांगितले. ब्राह्मणाने केलेला स्वयंपाक श्रीगुरुंनी कितीतरी ब्राह्मणांना पुरेल असा करवला. श्रीगुरुंनी त्याला आशीर्वाद दिला. तुझे दारिद्र्य दूर होईल. तुला पुत्र पौत्र होतील.

झाकिले वस्त्र अन्नावरी। कमंडलु उदक घेऊनि करी । 
श्रीगुरु प्रोक्षिती अन्नावरी । अभिमंत्रोनि तये वेळी । । ५० । । अध्याय ३८ ।।

भिक्षा घाल श्रीगुरु वदले, मन मोहरले । मन गहिवरले!ध्रु.

तुटपुंजे साहित्यच जवळी, काळजी न परि मना वाटली
स्वयंपाक सत्वर ही झाला, परब्रह्म जणु मला पावले!१

आरंभी उपहास साहिला, चला विप्रवर जेवायाला
आपणासवे श्रीगुरु जेवत, असे सांगता सगळे जमले!२

अन्न गुरुंच्या जवळ ठेवले, वस्त्राने होतेच झाकले
भरा भरा परि अन्न वाढले, पुरुन उरले । पुरुन उरले!३

तुझी गरीबी दूर जाहली, संतानाची चिंता सरली
औदार्या त्या नव्हती सीमा, धन्य धन्य सद्गुरु माऊली!४

कोमल भक्तिभाव जपावा, संशयास तिळ वाव न द्यावा
गुरुनिष्ठा उपयोगा आली, कृपा आगळी । कृपा जाणली!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Wednesday, March 3, 2010

महिमा शुद्धाचरणाचा.

३७. महिमा शुद्धाचरणाचा

या अध्यायात श्रीगुरुंनी पराशर ऋषींच्या उपदेशाच्या आधारे ब्राह्मणाला आचारधर्म सांगितला. पूजाविधी सांगितला. पाषाणाची मूर्ती पूजिली तरी देव प्रसन्न होतो हे सांगितले. ब्राह्मणाच्या आचारधर्माचे पालन करणारा देवांनाही वंद्य होईल. त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल. भोजन नुसते केले तर उदरभरण होईल पण शास्त्रोक्त विधीने केले तर यज्ञकर्म ठरते.

ऐसा ब्राह्मणाचा आचार| सांगता झाला पराशर।
ऐकोनि समस्त ऋषीश्वर । तेणेंपरी आचरती ।।२७८।। अध्याय ३७

श्रीगुरु येथे सांगत महिमा शुद्धाचरणाचा
राम कृष्ण हरि, विठ्ठल दत्त उच्चारो वाचा! ध्रु.

संध्यावंदन, प्रतिमापूजन आवश्यक असते
ध्‍यान तसे मन लावुन भोजन अंगी लागते
मी कर्ता ना भोक्ता जाणे तो नर भाग्याचा!१

आहारावर असे नियंत्रण शाकाहार बरा
सात्विकतेला पोषक ऐसा दुग्धाहार बरा
पोषणातही परिसर घेतो वाटा मोलाचा!२

लाच न घ्यावी, पोटासाठी विकू नये विद्या
स्वाध्‍यायाने स्वावलंबने वेदांची विद्या
उच्चाराची शुद्धि जपत तो विषय कौतुकाचा!३

वंदनभक्ती मने जिंकण्या उपकारक ठरते
जे ठावे ते जनां शिकवता समाधान मिळते
अपुल्या गरजा कमी कराव्या सांगावा गुरुचा!४

द्वेषाने धगधगती ज्वाळा दाहकता जाचे
मत्सर करता चडफडाट हो पोटदुखी जाचे
झाडा द्यावा लागे अंती सगळ्या पापांचा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

३६. कुलस्त्रीचे अंतःकरण दूषित असू नये.


Thursday, February 25, 2010